6 November 2026News Website

आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांचा दिव्यांग बांधवांशी संवाद समस्या जाणून घेऊन हक्काच्या निधीसाठी सकारात्मक पाठपुरावा करणार!

आर्णी :- स्थानिक विश्रामगृह येथे आमदार मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी दिव्यांग बांधवांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर प्रत्यक्ष संवाद साधला. या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी, प्रलंबित समस्या आणि त्यांच्या अपेक्षा प्राधान्याने जाणून घेण्यात आल्या.

याप्रसंगी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेला आमदार निधीतील राखीव निधी, तसेच ग्रामपंचायतीच्या एकूण निधीपैकी ५% दिव्यांग राखीव निधीच्या तरतुदी आणि त्याच्या योग्य विनियोगाबाबत सविस्तर चर्चा झाली. निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर कसा करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला.

दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

“दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही यावेळी आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी दिली. या बैठकीमुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

 

अभिषेक किशोर भागडे