7 November 2026News Website

विद्यार्थ्यांची बल्ले-बल्ले! शाळांना १४ दिवस ‘दिवाळी व्हॅकेशन’

२ नोव्हेंबरपासून सुट्ट्यांचा धमाका १५ नोव्हेंबरचा रविवार आल्याने थेट सोमवारी पुनरारंभ

स्वतंत्र विदर्भ न्यूज / विशेष प्रतिनिधी वरोरा :- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळांसाठी दिवाळी सुट्टीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना तब्बल १४ दिवसांची घसघशीत सुट्टी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १५ नोव्हेंबर रोजी रविवार आल्यामुळे शाळा आता थेट सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणार आहेत.

शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार चालू वर्षातील पहिले सत्र ३१ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर लागलीच २ नोव्हेंबरपासून सुट्ट्यांची पर्वणी सुरू होणार आहे. यंदा धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे मुख्य सण या सुट्टीच्या कालावधीतच येत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना कुटुंबासोबत सण आनंदाने साजरा करता येणार आहे.

माध्यमिक शाळा संहितेचे नियम कायम

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या देता येणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले २३० कामाचे दिवस पूर्ण करणे सर्व शाळा व्यवस्थापनांवर बंधनकारक राहील.

द्वितीय सत्राला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात

दिवाळी सुट्टी संपल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून शाळांचे दुसरे सत्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल. हे द्वितीय सत्र १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे.

स्थानिक पातळीवर तारखांमध्ये फेरबदल शक्यता राज्य स्तरावरून २ नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली असली, तरी जिल्ह्यानुसार स्थानिक शैक्षणिक उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी यांच्या पातळीवर सुट्ट्यांच्या तारखांमध्ये २ ते ३ दिवसांचा फेरबदल होऊ शकतो. पालकांनी यासंदर्भात आपापल्या शाळेच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अभिषेक किशोर भागडे