7 November 2026News Website

जलतरण क्रीडा प्रकारात NIS पदवी प्राप्त करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या महिला चौधरी भगिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

चंद्रपूर :- जलतरण (Swimming) या क्रीडा प्रकारात NIS पदवी प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या महिला कु. मनस्वी निलकंठ चौधरी आणि कु. तनस्वी निलकंठ चौधरी यांचा भव्य सत्कार सोहळा रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जलतरण तलाव, जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशन, चंद्रपूर यांच्या वतीने उत्साहात पार पडला.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वासजी झाडे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेंद्रजी अडबाले (गटनेते, मनपा चंद्रपूर), श्री. मोरेश्वर गायकवाड (प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी, ब्रह्मपुरी), श्री. नंदू आवारे (प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी, भद्रावती), श्री. प्रतीक पाटील (राज्य क्रीडा मार्गदर्शक, कबड्डी), श्री. कुंदन नायडू (छत्रपती पुरस्कारार्थी), श्री. महेंद्र कपूर (स्विमिंग NSI स्कोच) आणि श्री. दीपकभाऊ देऊळकर (सचिव, ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघ) उपस्थित होते.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशनचे सहसचिव श्री. अश्विन मुसळे यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन भेदे यांनी मार्गदर्शन करताना जलतरण क्रीडा प्रकारातील प्रशिक्षण, गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रातील संधी याबाबत आपले विचार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी चौधरी भगिनींच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



जलतरण क्षेत्रात NIS पदवी संपादन करून जिल्ह्यातील पहिल्या महिला होण्याचा मान मिळविणाऱ्या मनस्वी आणि तनस्वी चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उदयोन्मुख जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे श्री. शरदजी नागोसे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.



या सोहळ्याला चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशनचे सल्लागार व सदस्य श्री. धनंजय वड्यालकर,अमर रामटेके,श्री. निलकंठ चौधरी, श्री. सुधीर नागोसे अरविंद बुरडकर नितीन बुरडकर श्री हेमंत भाऊ घिवे तसेच जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौधरी भगिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भव्य सत्कार सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जलतरण क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली.

अभिषेक किशोर भागडे