7 November 2026News Website

गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुंबईत महाएल्गार!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरुद्ध ठाकरे बंधूंचे रणशिंग

  • विशेष प्रतिनिधी | मुंबई, ४ ऑक्टोबर २०२६

देशाच्या लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर होत असलेल्या घालांविरोधात आज मुंबईच्या रस्त्यांवर अभूतपूर्व जनक्षोभ लोटला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या (SIR) विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक विराट आणि ऐतिहासिक ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

“लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या” या ज्वलंत हाकेला साद देत हजारो नागरिक, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पक्षाचे झेंडे बाजूला सारून केवळ तिरंगा हातात घेऊन या महामोर्चानध्ये आक्रमक पवित्र्यात सहभागी झाले होते.

मोर्चाचे मुख्य विषय आणि मागण्या

  • मतदार याद्यांचे पुनरीक्षण (SIR) बेकायदेशीर: – देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना राबवली जाणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून ती तात्काळ थांबवावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.
  • ईव्हीएम (EVM) आणि मतचोरीचा मुद्दा :- आगामी सर्व निवडणुका कागदी मतपत्रिकेद्वारे (Paper Ballots) घेण्यात याव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
  • मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा :- निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला.

मंचावरील प्रमुख उपस्थिती

मंचावर झळकलेल्या ‘गर्जना – लोकतंत्र आणि संविधान वाचवण्यासाठी’ या फलकाच्या साक्षbने, राज्याचे दोन प्रमुख शिलेदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) अनेक दिग्गज नेते, प्रमुख पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

“सरकारला सळो की पळो करून सोडणार!” – नेत्यांचा इशारा

मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला जोरदार धारेवर धरले. “दोन कोटी मतदारांची नावे कुठल्या आधारावर वगळण्यात आली? हा लोकशाहीचा खून आहे,” असा घणाघात करत हा लढा आता थांबणार नाही, तर तो अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

अभिषेक किशोर भागडे