वरोरा :- शेतात कामावर जाणे बंद केल्याचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून एका 28 वर्षीय शेतमजूर तरुणाला रात्रीतून घरातून बोलावून घेतल्यानंतर अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याची थरकाप उडवणारी घटना वरोरा तालुक्यातील आश्री शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश बाहुरे याला आज (दि. २७) वरोरा न्यायालयात हजर करण्यात आले असून, वरोरा पोलिसांनी पोलीस कोठडीची (PCR) मागणी केली असता न्यायालयाने आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण वरोरा परिसरात संतापाची आणि खळबळीची लाट उसळली आहे.
फिर्यादी प्रदीप बालाजी काळे (वय 45, रा. आशी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, त्यांचा 28 वर्षीय मुलगा गणेश प्रदीप काळे हा शेतमजुरी करत होता. गावातील संशयित गणेश बाहुरे (रा. यशोदा नगर, पाण्याच्या टाकीजवळ, वरोरा, जि. चंद्रपूर) याने दोन वर्षांपूर्वी बालाजी गोवारदिपे यांची शेती विकत घेऊन ती ताब्यात घेतली असून, तो शेतात देशी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. चालू वर्षात मृतक गणेश हा बाहुरे याच्या शेतात मजुरीला जात असे; मात्र मुलाने त्यांच्या शेतात जाऊन काम करणे वडिलांना पसंत नसल्याने त्यांनी गणेशला तेथे कामावर जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर गणेशने बाहुरे यांच्या शेतात कामावर जाणे बंद केले होते.
याच पार्श्वभूमीवर दि. 13 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदीप काळे शेतातून घरी परतत असताना विजू परचाके यांच्या पानठेल्यामोरील रस्त्यावर गणेश बाहुरे हा गणेश काळे याच्याशी वाद घालून त्याला मारहाण करताना दिसला. त्यावेळी मुलाला सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या प्रदीप काळे यांनाही बाहुरेने ढकलत हातातील काठीने डोक्यावर मारून दुखापत केली होती. तेव्हापासून गणेश बाहुरे हा वडील व मुलाचा राग मनात धरून होता.
दरम्यान, दि. 25 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदीप काळे शेतात काम करत असताना त्यांच्या मोबाईलवर गणेश बाहुरे याचा फोन आला. गणेश हा फवारणीच्या कामासाठी राजू नांदे यांच्या शेतात गेल्याचे वडिलांनी सांगितले; त्यावर बाहुरेने संध्याकाळी फोन करण्यास सांगितले होते. सायंकाळी 06:30 वाजता घरी आल्यानंतर प्रदीप काळे यांनी मुलाला गणेश बाहुरेचा फोन आल्याचे सांगून मोबाईल दिला. त्यानंतर गणेशने बाहुरेला फोन केला, मात्र दोघांमध्ये काय बोलणे झाले याची माहिती वडिलांना नव्हती. त्यानंतर गणेश बाहुरे हा काही वेळातच प्रदीप काळे यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करत होता. रात्री 08:30 वाजता कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले आणि रात्री 09 वाजताच्या सुमारास मुलगा गणेश मोबाईल घेऊन घराबाहेर पडला.
पहाटे 04 वाजता प्रदीप काळे झोपेतून उठून पाहतात तर मुलगा घरी परतलेला नव्हता. त्यानंतर सकाळी 07 वाजण्याच्या सुमारास गावातील प्रमोद झाडे यांनी राजू नांदे यांच्या मोबाईलवर फोन करून गणेश हा धनराज आशेकर (रा. वरोरा) यांच्या शेतात पडून असल्याची माहिती दिली. राजू नांदे यांनी तातडीने घरी जाऊन ही बाब प्रदीप काळे यांना सांगितली. त्यानंतर प्रदीप काळे व राजू नांदे यांनी धनराज आशेकर यांच्या आश्री येथील शेतशिवारात जाऊन पाहिले असता, पराटीच्या पिकात गणेश हा मृत अवस्थेत आढळून आला व त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून आले.
दि. 25 नोव्हेंबरच्या रात्री 09 वाजल्यापासून दि. 26 नोव्हेंबरच्या सकाळी 06 वाजेदरम्यान वारंवार फोन करून भेटण्यास बोलावून घेतल्यानंतर धनराज आशेकर यांच्या आश्री शेतशिवारात जबर मारहाण करून गणेशचा खून केल्याचा संशय फिर्यादी प्रदीप काळे यांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित आरोपी गणेश बाहुरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला वरोरा न्यायालयात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास वरोरा पोलीस करत आहेत.