28 November 2026News Website

नमो उद्यानाच्या कामात मुरूमऐवजी कंपनीची राख? गुणवत्ता व निधीवर प्रश्नचिन्ह; सौ. वर्षा पिसाळ यांचा चौकशी व कारवाईचा इशारा

वरोरा :- शहरातील सरदार पटेल वॉर्डात सुरू असलेल्या नमो उद्यानाच्या बांधकामात नियमाप्रमाणे मुरूम मातीऐवजी कंपनीच्या राखेचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप वरोरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ. वर्षा मंगेश पिसाळ यांनी केला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.या वेळी भारतीय जनता पार्टीचे गटनेते अक्षय भिवदरे, वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार, नगरसेवक प्रवीण चिमूरकर, स्वीकृत सदस्य शंभुनाथ वरगने तसेच नगरसेविका सौ. लीना गयनेवार सौ. सीमा तडस, सौ. नलिनी आत्राम, सौ. नुपुर तेला, सौ. लता हिवरकर, सौ. मनिषा दानव उपस्थित होते.



सौ. वर्षा मंगेश पिसाळ यांनी नमूद केले आहे की, सरदार पटेल वॉर्डातील नमो उद्यानाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामात नियमानुसार मुरूम मातीचा वापर अपेक्षित असताना प्रत्यक्षात मुरूम मातीऐवजी कंपनीची राख वापरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे उद्यानाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, सार्वजनिक निधीचा गैरवापर, कामात अनियमितता आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शंका निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वापरण्यात येत असलेल्या साहित्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेमार्फत तपासणी करावी तसेच कामाचे अंदाजपत्रक, मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष काम यांची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.



चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी तसेच चौकशीचा अहवाल येईपर्यंत कामाची देयके अदा करू नयेत व केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणीही सौ. वर्षा मंगेश पिसाळ यांनी केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि बांधकामाच्या गुणवत्तेशी होणारी तडजोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असे सांगत या प्रकरणात कारवाई न झाल्यास नागरिकांच्या वतीने वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केली जाईल, याची नोंद घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

अभिषेक किशोर भागडे