वरोरा :- काळाच्या ओघात गावागावातील मंदिरांमधून काकड आरतीची परंपरा जवळपास लुप्त होत चालली असताना, देवांगन येथील हनुमान मंदिरात मात्र ही धार्मिक परंपरा आजही मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने जपली जात आहे. श्री मनोहर वर्भे परिवाराच्या पुढाकाराने सुरू असलेल्या महिनाभराच्या काकड आरती सोहळ्याची काल, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने भावपूर्ण सांगता झाली.
कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या उपक्रमाची सुरुवात होते. श्री मनोहर वर्भे परिवाराकडून दररोज पहाटे ५ वाजता गावातून प्रभात फेरी काढून हनुमान मंदिरात भजन, पूजन आणि काकड आरतीचे आयोजन केले जाते. या काळात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पहाटेच्या थंडीतही नित्यनियमाने हजेरी लावतात.
या महिन्याभराच्या सोहळ्यादरम्यान त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिरात पारंपरिक पद्धतीने ‘त्रिपुर’ प्रज्वलित करण्यात आला. संपूर्ण महिनाभर भजन-कीर्तनामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी काकड आरतीची सांगता होऊन सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.





