28 November 2026News Website

नागपूर–चंद्रपूर महामार्गावर ‘जीवघेण्या’ वेगाचा थरार; एकार्जुनातील कॉलनी क्रॉसिंगवर गतिरोधकांसाठी युवा सेनेचा एल्गार!

वरोरा :- नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत एकार्जुना हद्दीत, मालू पेट्रोल पंपालगत असलेल्या पद्मालय नगर, साकार नगर आणि घनश्याम नगर या वसाहतींच्या क्रॉसिंगवर भरधाव वाहनांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या ठिकाणी तातडीने अधिकृत गतिरोधक व सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था करण्यात यावी, या आक्रमक मागणीसाठी आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हाप्रमुखांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रकल्प अंमलबजावणी युनिट, चंद्रपूरच्या प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.



ग्रामपंचायत एकार्जुना हद्दीतील मालू पेट्रोल पंपालगत पद्मालय नगर, साकार नगर व घनश्याम नगर या तीन प्रमुख निवासी वसाहतींमध्ये अंदाजे ४,००० पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्व रहिवाशांना दैनंदिन कामकाजासाठी सातत्याने नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. या महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असून, अनेक वाहने अतिवेगाने धावत असतात. त्यामुळे महिला, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडताना दररोज जीव धोक्यात घालावा लागत असून, येथे भीषण अपघाताची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.



प्रमुख मागण्या आणि उपाययोजना :- या ठिकाणी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून खालील ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे:

  • मालू पेट्रोल पंपालगत पद्मालय नगर कॉलनी क्रॉसिंगवर नियमानुसार अधिकृत गतिरोधक (Speed Breaker) बसविण्यात यावा.
  • साकार नगर व घनश्याम नगर कॉलनी क्रॉसिंगवरही आवश्यकतेनुसार गतिरोधक किंवा इतर योग्य वेगनियंत्रक उपाययोजना कराव्यात.
  • नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक व आवश्यक दिशादर्शक चिन्हे लावण्यात यावीत.
  • रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी पुरेसा प्रकाश व रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात.
  • संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणाची ‘अपघातप्रवण ठिकाण’ म्हणून नोंद घ्यावी व तातडीने कार्यवाही करावी.

सदर परिसरात चार हजारांपेक्षा अधिक नागरिकांची वस्ती असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक निकष व सक्षम समितीच्या मंजुरीसह तातडीने कार्यवाही करावी, अशी विशेष विनंती करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, चंद्रपूर तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती; पोलीस अधीक्षक, चंद्रपूर; पोलीस अधीक्षक, महामार्ग वाहतूक पोलीस, नागपूर परिक्षेत्र; ग्रामपंचायत अधिकारी/सरपंच, ग्रामपंचायत एकार्जुना तसेच संबंधित तहसीलदार यांना आवश्यक हस्तक्षेप व समन्वयासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

अभिषेक किशोर भागडे