28 November 2026News Website

दिवाळीचा गोडवा गरजूंच्या चेहऱ्यावर; नायदेवच्या संस्थेतर्फे बुंदी वाटप

 नायदेव :- दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गोरगरीब, निराधार, गरजू व वंचित घटकांच्या जीवनातही आनंदाचा गोडवा निर्माण व्हावा, या उदात्त सामाजिक भावनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वृद्धाश्रम व श्रीकृष्णप्रिया गोरक्षण संस्था, नायदेव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त बुंदी वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत अहिल्याबाई होळकर अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना, तसेच शहरातील गोरगरीब, निराधार, गरजू व वंचित घटकांना बुंदीचे वाटप करण्यात आले. विशेषतः शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे स्वच्छता कर्मचारी, कचरा संकलन करणारे कामगार, रस्त्यावर कष्ट करणारे मजूर आणि हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी बांधवांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.या सामाजिक उपक्रमाला गुरुदेव सेवा मंडळातील विविध पदाधिकारी व प्रचारकांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये ह.भ.प. श्री. केशवरावजी खिरटकर महाराज (जिल्हा कीर्तन प्रचार प्रमुख व जीवन प्रचारक), प्रा. श्री. रूपालालजी कावळे (जिल्हा आजीवन प्रचारक), प्रा. श्री. कुळे सर (श्री गुरुदेव प्रचारक), श्री. प्रा. बालकृष्ण शेट्टी सर (गुरुदेव प्रचारक), श्री. पारोधे सर (म.प्रतिनिधी, गु.रु.कुं.आ. मोजरी), श्री. नंदकिशोरजी खिरटकर (गुरुदेव प्रचारक), श्री. कृष्णाजी पाकमोडे (गुरुदेव प्रचारक, तुमगाव), श्री. अशोकरावजी ठेंगणे (म.प्र. व जिल्हा कोषाध्यक्ष, चंद्रपूर), तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे नायदेवचे सचिव व माजी पोलीस पाटील श्री. संतोष रावतोडे उपस्थित होते. तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी गौरव नागरकर, उपसेवाधिकारी भीमराज मडावी, गुरुदेव सेवा मंडळ नायदेव पुजारी शेषराव बरडे व प्रेम जीवतोडे यांचीही उपस्थिती होती.दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा सण आहे; मात्र समाजातील अनेक घटक आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद मनाप्रमाणे साजरा करू शकत नाहीत. अशा व्यक्तींच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. समाजाच्या स्वच्छतेसाठी आणि हितासाठी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता मेहनत करणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या श्रमांचा सन्मान करणे, अनाथ बालकांना आणि वृद्धांना आपुलकीचा आधार देणे, हीच खरी समाजसेवा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकास, मानवसेवा आणि सामाजिक एकात्मतेच्या विचारांना अनुसरून संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात. भविष्यातही समाजातील गोरगरीब, गरजू, निराधार व वंचित घटकांसाठी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

“दिवाळीचा खरा आनंद स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे,” हा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अभिषेक किशोर भागडे