29 November 2026News Website

सुवर्णयश! वरोऱ्याच्या दोघांची राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड राज्यस्तरीय स्पर्धेत सानिया आवारी आणि रितिक धवणे यांची सुवर्णपदकावर मोहर; वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वरोरा :- वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात १८ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत वरोऱ्याच्या ‘फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमी’च्या दोन खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णयश संपादन केले आहे. या स्पर्धेत सानिया राजेश आवारी आणि रितिक श्रीकृष्ण धवणे या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या अचूक डावपेच व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत प्रथम स्थान पटकावले. दोघांनीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरून आगामी राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.



त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वरोरा शहराचा गौरव राज्यस्तरावर उंचावला असून, क्रीडाप्रेमी व नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या घवघवीत यशाबद्दल जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख शिहान विनय बोढे, फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सेन्सई रवी चरुरकर, सेम्पाई घनश्याम खोंडे, सेम्पाई फकिरा निखाडे, सेम्पाई अश्विनी नरड, सेम्पाई शोन दसुडे तसेच अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर (माजी सैनिक व नगरसेवक), दिगंबर खापणे (माजी सैनिक) आणि रवी तुरानकर यांनी दोन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेतील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक किशोर भागडे