28 November 2026News Website

चिंधिमाल फाट्याजवळ भीषण कार अपघातात वरोरा तालुक्यातील दोघांचा मृत्यू पाच जण जखमी; नागभीड-तलोधी मार्गावरील दुर्घटना

नागभीड :-  नागभीड-तलोधी मार्गावरील चिंधिमाल फाट्याजवळ पुलाच्या नजीक शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता भरधाव कार उलटून झालेल्या भीषण अपघातात वरोरा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. सुदर्शन नैताम (रा. रामपूर, ता. वरोरा) आणि दिनेश धोटे (रा. खांबाडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) अशी मृतकांची नावे आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २४ एडब्ल्यू २९१० क्रमांकाच्या कारमधून सात जण तलोधी बालापूर येथून नागभीडकडे येत होते. दरम्यान, चिंधिमाल फाट्याजवळ पुलाच्या नजीक भरधाव कार अचानक रस्त्यावरून खाली घसरली. चालकाने कार पुन्हा डांबरी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळा पलटी खाल्ली.



या अपघातात रामपूर (ता. वरोरा) येथील सुदर्शन नैताम यांचा जागीच मृत्यू झाला, तर खांबाडा (ता. वरोरा) येथील दिनेश धोटे यांच्यासह आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. कारमध्ये बसलेल्या उर्वरित चौघांनाही दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच चिंधिमाल गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना तात्काळ नागभीड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी दिनेश धोटे यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, कार चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची शंका प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी नागभीड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अभिषेक किशोर भागडे