कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या तसेच कृषी योजनांच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालयात (कृषी मंत्र्यांच्या दालनात) ही बैठक पार पडणार आहे.
प्रकल्प पूर्ण होऊनही कार्यान्वित होण्यात अडचणी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबावी, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि मूल्यवर्धन साखळी निर्माण व्हावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभारले आहेत. मात्र, तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे बांधकाम पूर्ण होऊनही अनेक प्रकल्प अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत. या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा वैनगंगा शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.
💥 या प्रमुख विषयांवर होणार चर्चा 💥
- स्मार्ट प्रकल्प (SMART) :- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्पांना गती देणे.
- जैविक शेती मिशन :- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोला येथेच कायम ठेवण्याबाबत निर्णय घेणे.
- खनिज विकास निधी (DMF) :- जिल्हा खनिज विकास निधीतून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी भरीव निधीचे नियोजन करणे.
- पोकरा टप्पा-२ (PoCRA) :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा २.०) जाचक अटी शिथिल करून, ‘पोकरा टप्पा-१’ च्या धर्तीवर प्रभावी अंमलबजावणी करणे.
उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीसाठी कृषी विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे सूचना पत्र निर्गमित करण्यात आले आहे. स्वतः आमदार देवराव भोंगळे या बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रभाग संघ आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी केले आहे.





