13 November 2026News Website

एकही पात्र वनहक्कधारक हक्काच्या वनपट्ट्यापासून वंचित राहू नये – आ. विजय वडेट्टीवार

ब्रह्मपुरी :- एकही पात्र वनहक्कधारक हक्काच्या वनपट्ट्यापासून वंचित राहू नये.वनहक्कधारकांसाठी १३ नोव्हेंबरला ब्रह्मपुरीत विशेष शिबिर अपील, दावा दुरुस्ती व नवीन दावे सादर करण्याची मिळणार संधी.गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच वनहक्क पट्ट्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजयभाऊ वडेट्टीवार व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर व सावली या चार तालुक्यांतील वनहक्क, महसूल व अतिक्रमणधारकांना अधिकृत वनहक्क पट्टे मिळवून देण्याच्या दृष्टीने शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ब्रह्मपुरी येथील स्वर्गीय राजीव गांधी सभागृह ऊर्जा रोड ब्रह्मपुरी येथे सकाळी 11 वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मा. शिवानी वडेट्टीवार यांच्या विशेष पुढाकारातून, जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे.या शिबिरात वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांसंदर्भातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक त्रुटी, अपुरी कागदपत्रे अथवा अन्य कारणांमुळे नामंजूर झालेले दावे, प्रलंबित असलेले दावे तसेच अद्याप सादर न केलेले नवीन दावे याबाबत संबंधित नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय नामंजूर दाव्यांबाबत अपील सादर करणे, जुन्या दाव्यांमधील त्रुटींची दुरुस्ती करणे आणि नवीन दावे दाखल करण्याची प्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.



वनहक्काचा प्रश्न हा हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी आणि त्यांच्या भवितव्याशी निगडित आहे. अनेक पात्र कुटुंबे आवश्यक माहितीचा अभाव, कागदपत्रांतील त्रुटी किंवा प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींमुळे आपल्या हक्कापासून दूर राहतात. अशा नागरिकांना एकाच ठिकाणी आपल्या दाव्यांबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.

गावागावांतून पात्र लाभार्थ्यांना सहभागी करण्याचे आवाहन

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर व सावली तालुक्यांतील गावांमध्ये ज्या पात्र वनहक्कधारकांचे वैयक्तिक किंवा सामूहिक दावे नामंजूर झाले आहेत, प्रलंबित आहेत अथवा अद्याप दाखल झालेले नाहीत, अशा सर्व संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात उपस्थित राहावे. तसेच गावातील पात्र लाभार्थ्यांना या शिबिराची माहिती देऊन त्यांना सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

एकही पात्र वनहक्कधारक आपल्या हक्काच्या वनपट्ट्यापासून वंचित राहू नये, प्रत्येक पात्र कुटुंबाला न्याय मिळावा आणि वनहक्क दाव्यांमधील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर चारही तालुक्यांतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अभिषेक किशोर भागडे