12 November 2026News Website

दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी चंद्रपूर मध्यवर्ती बँक; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले २५.६० लाखांचे योगदान

नागपूर :-  नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना खंबीर आधार देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुन्हा एकदा मोठी सामाजिक बांधिलकी जपली आहे. बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने पुढाकार घेत तब्बल ₹२५,६०,८७८/- (रुपये पंचवीस लाख साठ हजार आठशे अठ्ठ्याहत्तर फक्त) इतक्या भरभक्कम मदतीचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.



आमदार मा. श्री. बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वात ही बँक केवळ व्यावसायिक बँकिंग पुरती मर्यादित न राहता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे यातून पुन्हा सिद्ध झाले आहे. याआधीही २२ जुलै २०२५ रोजी २५ लाख आणि १३ ऑक्टोबर २०२५ रोजी २१ लाखांचे योगदान देत बँकेने नेहमीच आपत्ग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. बँकेच्या या सलग व भरीव सामाजिक उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष कौतुक केले असून, हा संपूर्ण बँक परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे.



या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमदार मा. श्री. बंटीभाऊ भांगडिया, बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष मा. श्री. संजय डोंगरे, मानद सचिव मा. श्री. अवेशखान पठाण, तसेच संचालक मा. श्री. दिनेश चोखारे, मा. श्री. गणेश तर्वेकर, मा. श्री. रोहित बोम्मावार आणि मा. श्री. जयंत टेंभुर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे