13 November 2026News Website

चंद्रपूर जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ उत्साहात; विविध उपक्रमांचे आयोजन

चंद्रपूर :- आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके आणि अनु. जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत जिल्ह्यात विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम पार पडत आहेत.

सेवा सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम :

  • १३ नोव्हेंबर (व्याख्यान व शिबीर) :- नवतळा, जामनी, सावरगाव, चिमूर, भद्रावती, वरोरा व चिनोरा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर व्याख्याने झाली. तसेच पारधी व कोलाम पाड्यांवर विशेष शासकीय योजना शिबिरे घेण्यात आली.
  • १४ नोव्हेंबर (स्वच्छता व दीपोत्सव) :- जनजाती शहीद महापुरुषांचे पुतळे व स्मारकांची स्वच्छता करून आकर्षक रोषणाई व दीपोत्सव साजरा करण्यात आला.
  • १५ नोव्हेंबर (भव्य शोभायात्रा) :- जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील जनजाती वस्त्या व पाड्यांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या.
  • १६ नोव्हेंबर (आरोग्य शिबीर व करिअर मार्गदर्शन): आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये आरोग्य शिबिरे, सिकलसेल तपासणी आणि १० वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.
  • १७ नोव्हेंबर (वनहक्क पट्टे वितरण) :- तहसील कार्यालयांमध्ये सामूहिक व वैयक्तिक वनहक्क पट्टे, प्रमाणपत्रे आणि जातप्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
  • १८ नोव्हेंबर (समारोप व गुणगौरव) :- सेवा सप्ताहाचा समारोप असून यामध्ये ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’, बचत गटांना अर्थसहाय्य आणि आदिवासी कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी आणि आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश मेश्राम, धनराज कोवे, राघो गेडाम, कैलास कुमरे, कमलेश आत्राम, ज्योती वेलके आणि वसंतराव सिडाम यांनी केले आहे.

अभिषेक किशोर भागडे