7 November 2026News Website

‘सतरा वर्षे झाली, रस्ता कधी होणार?’

मक्सूरच्या रस्त्यासाठी मनसे आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांना धडक निवेदन, खनिज विकास निधीतून तातडीने काम करण्याची मागणी

वरोरा (विशेष प्रतिनिधी) :-चंद्रपूर हा खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा असला, तरी याच जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मक्सूर गावातील ग्रामस्थांना मागील १७ ते १८ वर्षांपासून पक्क्या रस्त्याअभावी नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याच्या अभावामुळे गावात रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाही. या गंभीर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतून या रस्त्याचे काम त्वरित मंजूर करून पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रमुख समस्या रुग्ण दगावण्याचा धोका अन् विद्यार्थ्यांचे हाल

निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, मक्सूर गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून पावसाळ्यात आणि इतर दिवसांतही या मार्गावरून ये-जा करणे जिवघेणे ठरले आहे.

  • आरोग्याची हेळसांड :- पक्का रस्ता नसल्याने गंभीर प्रसंगी गावात रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, परिणामी रुग्णांचे प्राण धोक्यात येतात.
  • विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास :-शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि खड्ड्यांच्या साम्राज्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान :- शेतमाल बाजारात नेण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मनसेचा इशारा खनिज निधी वळवून काम सुरू करा!

चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधी (DMF) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, खनिज प्रभावित क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हा या निधीचा मूळ उद्देश आहे. मक्सूर गावातील रस्ता हा याच निकषात बसत असल्याने, या प्रलंबित रस्त्याच्या कामाला ‘जिल्हा खनिज निधी’ अंतर्गत त्वरित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून ग्रामस्थांची होणारी पिळवणूक थांबवून तातडीने सर्वेक्षण करावे आणि कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या शिष्टमंडळात व निवेदनावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष प्रशांत सुमन जनार्दन जुंजारे, शहर अध्यक्ष आनंद गेडाम, तालुका उपाध्यक्ष आलोक जाधव, शहर उपाध्यक्ष प्रतीक मुडे, शहर उपाध्यक्ष साजिद पठाण यांच्यासह मक्सूर गावचे मोठ्या संख्येने महिला व पुरुष गावकरी उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे