6 November 2026News Website

वर्धेत विदर्भ राज्य जनसंकल्प मेळावा संपन्न; सेवाग्राम ते वर्धा भव्य मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच ॲड. वामनराव चटप

वर्धा (प्रतिनिधी) :- “लढू, मरू, जेलमध्ये सडू; पण डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही,” असा वज्रमुठीचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी वर्धा येथे व्यक्त केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वर्धेत आयोजित ‘विदर्भ राज्य जनसंकल्प मेळाव्यात’ ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

प्रमुख ठळक मुद्दे व आंदोलनाची भूमिका

  • विकासातील तफावत :- विदर्भात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि संपत्तीचा महापूर असूनही, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत हा प्रदेश विकासाच्या बाबतीत जाणूनबुजून मागे ठेवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
  • गंभीर प्रश्न :- सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे विदर्भातील शेती आजही प्रामुख्याने कोरडवाहू आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
  • रोजगाराचा अभाव :- युवकांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी नाहीत, उद्योगांचा अथांग अभाव आहे आणि शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विदर्भाला डावलले जात असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
  • स्वतंत्र राज्याची गरज :- मुंबईतील मंत्रालयापर्यंत विदर्भातील जनतेचा आवाज प्रभावीपणे पोहोचत नसल्याने, आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती हाच एकमेव पर्याय उरला असल्याचे मेळाव्यात एकमुखाने ठरले.

सेवाग्राम ते वर्धा भव्य मोटारसायकल रॅली

मेळाव्याची सुरुवात अत्यंत जोशपूर्ण वातावरणात झाली. ऐतिहासिक सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या बापू कुटीपासून ॲड. वामनराव चटप आणि जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये २०० हून अधिक मोटारसायकलींवर स्वार होऊन शेकडो तरुण व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली सेवाग्रामवरून निघून वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत कारला चौक येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात पोहोचली, जिथे जनसंकल्प मेळाव्याला प्रारंभ झाला.

विदर्भाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी या लढ्यात विदर्भातील तमाम जनता, तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

अभिषेक किशोर भागडे