7 November 2026News Website

दोन ऑक्टोबर पासून सुरू होणार नागपूरकरांचे तिसरे ‘अभ्युदय सेवा प्रदर्शन–दान महोत्सव’ चिटणवीस सेंटरमध्ये सेवाभावी संस्थांचे कार्य एकाच छताखाली; तीन दिवस निःशुल्क प्रशिक्षणाचेही आयोजन

नागपूर :- सेवाभावी संस्था, दाते, नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्र यांना एका व्यासपीठावर आणून सामाजिक सेवेला बळ देण्याच्या उद्देशाने ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आणि सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्टच्या सहकार्याने ‘तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन–दान महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २, ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. प्रदर्शन नागरिकांसाठी दररोज दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.



प्रदर्शनाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी इन्फोसेप्ट्स डेटा आणि एआय,चे प्रशासन, सीएसआर आणि ईएसजी ग्लोबल हेड सुनील नरवारे, निवृत्त आयपीएस अधिकारी तथा हिंदू रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष टी. एस. भाल आणि Auro Infra Pvt. Ltd., Warora चे CSR व Land Acquisition विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त २०१२ मध्ये ग्रामायणच्या कार्याला सुरुवात झाली. विविध सेवाभावी संस्थांना भेटी देणे, नागरिकांना सामाजिक प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती करून देणे आणि संस्था व समाज यांच्यातील संवाद वाढविण्यापासून या कार्याचा विस्तार झाला. सामाजिक संस्था, बचत गट आणि ग्रामीण उत्पादकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. स्वदेशी, स्वनिर्मित, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी ग्रामायण प्रदर्शनाने स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, आतापर्यंत सात प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.



गेल्या वर्षापासून सेवाभावी संस्थांसाठी स्वतंत्र ‘अभ्युदय सेवा प्रदर्शन’ सुरू करण्यात आले. सहभागी सेवाभावी संस्थांना हे व्यासपीठ पूर्णतः निःशुल्क उपलब्ध करून दिले जाते. प्रसिद्धीसोबत दाते, CSR संपर्क, स्वयंसेवक, तज्ज्ञ, प्रशिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अभिषेक किशोर भागडे