7 November 2026News Website

“वरोरा शहराची एकता हीच आपली ओळख”: सलोख्याचा गोड संदेश

वरोरा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नवा इतिहास; गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा मुस्लिम बांधवांकडून गौरव!

“वरोरा शहराची एकता हीच आपली ओळख” सलोख्याचा गोड संदेश.

वरोरा :- एकता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा उत्तम वस्तुपाठ घालत वरोरा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. भूतकाळातील कटू आठवणींना पूर्णविराम देत आणि भविष्यात असा प्रसंग पुन्हा कधीही ओढवू नये यासाठी, शहरातील मानाचे गणपती, मोठे विठ्ठल मंदिर, लहान विठ्ठल मंदिर तसेच हनुमान मंदिर देवस्थान या प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सन्मानपूर्वक शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात येत आहे.



“वरोरा शहराची एकता हीच आपली ओळख” हा ठळक संदेश देत दोन्ही समाजांनी एकत्र येऊन शहराच्या शांततेला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हा केवळ सत्कार नसून, तो परस्परविश्वासाचा आणि अतुट मैत्रीचा जाहीरनामा ठरत आहे.



💥 मान्यवरांची उपस्थिती आणि दणदणीत सहकार्य 💥

सकाळी ११.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत चालणाऱ्या या भव्य सत्कार कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभत आहे. यामध्ये आमदार, खासदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विविध पक्षांचे प्रमुख नेते, पोलीस अधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे अध्यक्ष यांचा विशेष सन्मान केला जात आहे.



शेख जैरुदीन छोटूभाई, आसिफ भाई रजा, जहाज भाई, शब्बीर भाई, शेख मोहसीन भाई पठाण, वसीम भाई, शेख इम्रान भाई, शेख मुजाहिद कुरेशी यांच्यासह अनेक सहकारी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच हाजी हबीब भाई रजा, हाजी मकसूद भाई शेख, हाजी अखिल भाई खान, सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ शेंडे आणि पत्रकार प्रदीप कोहपरे गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.



💥 पुढील वाटचाल सलोखा असाच कायम राहणार!

“मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात सर्व समाजांच्या सहकार्याने सामाजिक सलोख्याचे उपक्रम राबविले जात आहेत. वरोराच्या मातीतील ही एकता अशीच कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढेही सर्व समाजाला सोबत घेऊन शहराची शान वाढवणारे असे उपक्रम सातत्याने राबविले जातील.” शेख जैरुदीन छोटूभाई (प्रमुख आयोजक)

वरोरा शहराच्या या दमदार आणि आक्रमक पण तितक्याच सलोख्याच्या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात ऐक्याची नवी लाट निर्माण केली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून तुफान कौतुक होत आहे.

 

अभिषेक किशोर भागडे