वरोरा :- तळागाळातील लोकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि पारदर्शक सहकार चळवळीचा आदर्श निर्माण करणारी अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून परिचित असलेल्या ‘श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी’ च्या वरोरा शाखेने यशस्वीपणे १८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने वरोरा शाखेचा १८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर आरोग्य लाभो, या सदिच्छा यादरम्यान व्यक्त करण्यात आल्या.
या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी संस्थेचे संचालक परीक्षित एकरे, शाखा मॅनेजर विलास बोबडे, पतसंस्थेचे सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व
दैनिक अभिकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केल्याबद्दल पतसंस्थेच्या या वरोरा शाखेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेविषयी थोडक्यात माहिती
स्थापना व मुख्यालय :-१० ऑक्टोबर १९८९ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेली ही संस्था आज सहकार क्षेत्रात वटवृक्ष बनली असून, वणी येथे मुख्य कार्यालय आहे.
नेतृत्व :- स्व. गंगाधरराव पामपट्टीवार आणि संस्थेचे अध्यक्ष एड. देविदासजी काळे यांच्या दूरदृष्टीतून आणि समर्पित नेतृत्वाखाली ही संस्था उदयाला आली.
विस्तार व पत :- ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या २१ हून अधिक शाखांच्या माध्यमातून कार्यरत असून, सातत्याने ‘अ’ (A) वर्ग ऑडिट मिळवणारी, ग्राहकांच्या विश्वासू ठेवी व विविध कर्ज योजनांसाठी प्रसिद्ध असलेली अग्रगण्य सहकारी संस्था आहे.




