वरोरा :- तालुक्यातील शेगाव (बु) येथे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरासमोर वारंवार जादूटोण्याचे साहित्य टाकून कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या शेजाऱ्यांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी सागर नंदकिशोर निखाते (वय ३०, रा. शेगाव (बु) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे शेजारी स्वप्निल विलास निखाते यांच्याशी त्यांचे जुने वाद आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सागर निखाते यांच्या घरासमोर आणि त्यांच्या कंपाऊंडमध्ये काळी बाहुली, लिंबू, फोटोवर खिळे मारलेले साहित्य, हळद, गुलाल, बुक्का असे जादूटोण्याशी संबंधित साहित्य टाकले जात होते.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या सागर निखाते यांनी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, स्वप्निल निखाते हे साहित्य टाकताना दिसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मारहाण आणि वाद :- या विषयावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तक्रारीनुसार, स्वप्निल निखाते यांनी सागर यांच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर रेणुका विलास निखाते यांनीही धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पोलीस कारवाई :- सागर निखाते यांच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी स्वप्निल विलास निखाते आणि रेणुका विलास निखाते यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये तसेच ‘नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




