Home राजकारण यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; प्रलंबित पदभरतीबाबत महत्त्वपूर्ण बैठक...

यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; प्रलंबित पदभरतीबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

यवतमाळ :- पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पदभरतीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी यवतमाळ येथील महसूल भवन येथे नुकतीच एक उच्चस्तरीय महत्त्वाची बैठक पार पडली. आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.



या बैठकीस जिल्हाधिकारी विकासजी मीना, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच आंदोलक विद्यार्थी व बेरोजगार युवक उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, महसूल, वन, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामविकास विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रिक्त पदे, समायोजित पदे, बिंदुनामावली, सेवा प्रवेश नियम व पदभरतीतील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शासनस्तरावरील प्रलंबित प्रश्न व अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी आगामी १५ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच पदभरतीसंदर्भातील सर्व आवश्यक माहिती पारदर्शकपणे आंदोलनकर्त्या विद्यार्थी व युवकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्या.



प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आल्यामुळे आणि मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, आंदोलक विद्यार्थी व बेरोजगार युवकांनी आपले सुरू असलेले आंदोलन अधिकृतपणे स्थगित केल्याची घोषणा केली. आदिवासी समाजातील विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार असल्याचे आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.