Home महाराष्ट्र यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; मंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित.

यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; मंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित.

यवतमाळ :- पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पदभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर यशस्वी आणि सकारात्मक तोडगा निघाला आहे. आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी थेट आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थी व बेरोजगार युवकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या व अडीअडचणी सविस्तरपणे समजून घेत शासनाची अत्यंत सकारात्मक भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आली. शासनाच्या वतीने पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील पदभरतीचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, शासनस्तरावरील उर्वरित सर्व तांत्रिक अडचणी व प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवण्यासाठी आगामी १५ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व प्रमुख विभागांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला.
शासन स्तरावरून झालेल्या या सकारात्मक घडामोडींमुळे आणि मागण्यांच्या पूर्ततेबाबत ठोस आश्वासन मिळाल्यामुळे, आंदोलक विद्यार्थी व बेरोजगार युवकांनी आपले सुरू असलेले आंदोलन अधिकृतपणे स्थगित केल्याची घोषणा केली. समाजातील तरुण वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हा पाठपुरावा यापुढेही असाच सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.