Home Breaking News नागपूर ग्रामीण पोलिसांचा धडाकेबाज प्रहार: झारखंडमधून २ किलो २८५ ग्रॅम अफू जप्त;...

नागपूर ग्रामीण पोलिसांचा धडाकेबाज प्रहार: झारखंडमधून २ किलो २८५ ग्रॅम अफू जप्त; १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

उमरेड/नागपूर :- अमली पदार्थांच्या तस्करीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत आक्रमक कारवाई केली आहे. उमरेड पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, विशेष पथकाने थेट झारखंड गाठून २ किलो २८५ ग्रॅम अफू (Opium) आणि इतर साहित्यासह एकूण १३ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी कारवाई काय ?
उमरेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करताना, नागपूर ग्रामीणच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने सापळा रचून झारखंडमधील खुंटी जिल्ह्यापर्यंत धडक दिली. उमरेड पोलीस स्टेशन आणि विशेष पथकाने संयुक्तरित्या आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, तिथे अंमली पदार्थ लपवून ठेवल्याचे आढळून आले.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत १३,०५,५०० रुपये)
पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
अफू २.२८५ कि.ग्रॅम (किंमत ११,४२,५०० रुपये)
डेल लॅपटॉप १५,००० रुपये मोबाईल हॅन्डसेट (२ नग) ३,००० रुपये
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ५,००० रुपये
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी
ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उमरेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती भाग्यश्री धिरबस्सी , उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी जडक , अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि अजितसिंग देवरे , पोउपनि  प्रवीण भिमटे , पोहवा  प्रवीण देव्हारे , पोशि  अनिल खरडकेले , तसेच उमरेड पोलीस स्टेशनचे पोउपनि कार्तिक सोनटक्के आणि पोशि  राहुल नागपुरे  यांच्या टीमचा समावेश होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असून, अमली पदार्थांच्या जाळ्याचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत.