28 November 2026News Website

वरोरा नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा ‘कोमात’!

वरोरा : वरोरा शहराच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा सध्या केवळ शोभेची बाहुली ठरली आहे. वरोरा नगरपरिषदेच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी शहरातील मुख्य जाजू चौक (शहीद योगेश डाहुले चौक) येथे बॅनर लावताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही हृदयद्रावक घटना घडली, त्याच्या आजूबाजूला तब्बल चार सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. मात्र, हे सर्व कॅमेरे बंद असल्याने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद होऊ शकली नाही. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, शहरात उद्या एखादी मोठी गुन्हेगारी घटना किंवा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल वरोरेकर विचारत आहेत.



मुख्य चौकातच ‘तीसरा डोळा’ निकामी :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीवर वचक बसावा आणि अपघातांचे धागेदोरे मिळावेत या उद्देशाने नगरपरिषदेने प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र, देखभाल आणि दुरुस्तीअभावी या कॅमेऱ्यांनी कधीच मान टाकली आहे. दोन दिवसांपूर्वी जाजू चौकात एका निष्पाप मजुराचा नाहक बळी गेला. या घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरले असते. परंतु, घटनास्थळावरील चारही कॅमेरे केवळ धूळ खात पडून असल्याचे समोर आले. या घटनेचा तपास करताना पोलिसांसमोरही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.



नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत ? शहराच्या सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर वरोरा नगरपरिषद प्रशासन इतके उदासीन का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभालीवर होणारा खर्च नेमका जातो कुठे? बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करण्याची तसदी प्रशासन का घेत नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. एकीकडे शहरात चोरी, छेडछाड आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, शहराचा ‘तीसरा डोळा’च आंधळा झाल्याने गुन्हेगारांचे फावले आहे.

नागरिकांचा इशारा :- “मजुराच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद न होणे ही अत्यंत खेदाची आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. नगरपरिषद नेमके करते काय? प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे का? जर येत्या काही दिवसांत शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा युद्धपातळीवर दुरुस्त करून कार्यान्वित केली नाही, तर नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शहरातील जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. सी ओ यांना फोन केल्यास ते फोन उचलतच नाही.

आता तरी वरोरा नगरपरिषदेला जाग येणार का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

अभिषेक किशोर भागडे