आर्णी :- दिवाळी हा केवळ रोषणाईचा आणि दिव्यांचा सण नसून, माणसामाणसांतील प्रेम, आपुलकी आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण आहे. याच भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाच्या आनंदात सहभागी होत, आर्णी तालुक्यातील कारेगाव (अंजी) येथील पारधी बेड्यावर आमदार मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी गावातील नागरिक, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांसोबत दिवाळीचा सण अतिशय उत्साहात आणि आपुलकीने साजरा केला.
या विशेष प्रसंगी आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी पारधी बेड्यावरील ग्रामस्थांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप केले. त्यांच्यासोबत हसत-खेळत आनंदाचे क्षण व्यतीत करत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या सुख-दुःखाची आस्थेने विचारपूस केली. गावातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी तसेच स्थानिक पातळीवरील विविध विकासकामांच्या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेत त्यावर सकारात्मक चर्चा केली.
आमदार महोदयांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. गावकऱ्यांनीही अतिशय आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्यांचे स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. निसर्गाच्या सान्निध्यात पारधी बेड्यावरील ग्रामस्थांसोबत घालवलेले हे आनंदाचे क्षण आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर झळकलेले समाधानाचे हास्य यामुळे या वेळची दिवाळी अधिकच अर्थपूर्ण आणि द्विगुणित झाली.
“जनतेच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आमचा नेहमीच ध्यास आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सणानिमित्त समस्त नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!





