चंद्रपूर :- दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घेऊन येतो. मात्र समाजातील वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून युथ सोशलग्राम फाउंडेशनच्या वतीने ‘दिवाळी वंचितांसोबत’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील २२ ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी सण उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. सणाच्या निमित्ताने त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या सदस्यांनी केला. दिवाळी केवळ दिव्यांची नसून माणुसकी, प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सदर कार्यक्रम युथ सोशलग्राम फाउंडेशनच्या ‘दिवाळी ब्ल्यू प्रिंट’ नुसार आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील वैभव जिवतोडे, रुपेश कुत्तरमारे, मयूर हनवते, सूर्यकांत जांभुळे, क्षितिज केराम, नकुल गोवर्धन, ममता काकडे, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. आशिष माणूसमारे महाराज, नामदेव सातपुते, आकाश हाके, वनश्री किन्हेकार आणि राकेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
तसेच पुणे जिल्ह्यातील प्रतीक्षा तरल, गडचिरोली जिल्ह्यातील रश्मी कामठे व लखन नन्नावरे, छत्रपती संभाजीनगर येथील प्रज्ञा चौधरी, नाशिक येथील ऋषिकेश शेलार आणि सोलापूर येथील योगेश करचे यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. सोबतच काही सभासदांनी सोशल मीडियाच्या द्वारे हरित दिवाळी अंतर्गत जनजागृती करण्यात आली
हा कार्यक्रम फाउंडेशनचे संस्थापक श्री. योगेश चौधरी, सहसंस्थापक श्री. अमित भारद्वाज, अध्यक्ष मोहित कुमार, उपाध्यक्ष नेहा कुमारी तसेच सचिव महोदया आणि खुशी बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदात संपन्न झाला.
‘दिवाळीचा खरा प्रकाश हा केवळ घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे,’ हा सुंदर सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सण साजरे करण्याच्या फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





