7 November 2026News Website

आमदार देवराव भोंगळे यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश.

२५ कोटींच्या निधीतून राजुरा शहराचा होणार कायापालट!

बिरसा मुंडा चौक ते रेल्वे फाटक व भवानी माता मंदिर रस्त्याचे होणार दुतर्फा सिमेंट काँक्रीटकरण.

दुभाजक, पथदिवे, ड्रेनेज व आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज होणार रस्ता.

राजुरा, दि. ०३ :- राजुरा शहरातील मुख्य रस्त्यांवरून होणारी अवजड वाहतूक आणि त्यामुळे झालेली रस्त्यांची प्रचंड दुरवस्था ही स्थानिक नागरिकांसाठी व वाहनधारकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरत होती. धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. हीच गंभीर समस्या ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी विशेष पुढाकार घेत केंद्रीय महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे सातत्यपूर्ण पत्रव्यवहार व पाठपुरावा सूरू केला. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण आणि खंबीर पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राजुरा शहरातील मुख्य मार्गांच्या कामासाठी तब्बल २५ कोटी २ लाख २६ हजार २३९ रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

या विकासकामांतर्गत राजुरा शहरातील अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा चौक ते रेल्वे फाटक आणि बिरसा मुंडा चौक ते भवानी माता मंदिर या दोन्ही मुख्य मार्गांवर एकूण ९.०२४ किलोमीटर लांबीच्या प्रशस्त सिमेंट काँक्रीट (PQC) रस्त्याचे दुतर्फा बांधकाम करण्यात येणार आहे.

शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध व्हावी यासाठी या रस्त्यांच्या मधोमध आकर्षक दुभाजक (Divider) उभारले जाणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळी प्रवाशांना आणि स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ५८ प्रमुख ठिकाणी आधुनिक पथदिवे (Street Lights) बसवले जातील. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक व माहिती फलक (Sign Boards) लावले जाणार आहेत. याशिवाय पावसाळ्यात पाणी साचून रस्त्याची दैना होऊ नये यासाठी ५,३५० मीटर लांबीच्या भक्कम ड्रेनेज व नाल्यांचे बांधकामही या निधीतून केले जाणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे राजुरा शहरातील वाहतूक समस्या कायमची सुटणार असून दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. शहराच्या या धडक विकासकामाबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल राजुरा शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आमदार देवराव भोंगळे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

अभिषेक किशोर भागडे