Home जिल्हा विकासाच्या नावाखाली ठेकेदारांचे आर्थिक शोषण; रखडलेली देयके तात्काळ अदा करा – शिवसेनेचा...

विकासाच्या नावाखाली ठेकेदारांचे आर्थिक शोषण; रखडलेली देयके तात्काळ अदा करा – शिवसेनेचा आक्रमक पवित्रा.

चंद्रपूर :-ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची अनेक महिन्यांपासून रखडलेली देयके तत्काळ अदा करावीत, या आक्रमक मागणीसाठी शिवसेनेचे अंकित जोगी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांना निवेदन सादर केले आहे.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारखी विकासकामे पूर्ण झाली आहेत. मात्र, संबंधित ठेकेदारांना त्यांचे देयक मिळालेले नाही. ग्रामपंचायतींकडे निधी उपलब्ध असूनही, सध्या कार्यरत असलेल्या प्रशासकीय समित्यांना आर्थिक अधिकार नसल्याने ही देयके प्रलंबित असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.



💥 ठेकेदारांसमोर गंभीर आर्थिक संकट 💥
या विलंबामुळे ठेकेदारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यांना मजुरांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी आणि बँकेच्या कर्जाचे हफ्ते भरताना मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात ग्रामीण भागातील विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे.



प्रशासकीय अधिकारांबाबत मार्गदर्शक सूचनांची मागणी
रखडलेली देयके अदा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, तसेच प्रशासकीय समित्यांच्या आर्थिक अधिकाराबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना मागवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. बच्चू कडू, भरत गुप्ता, जिल्हाप्रमुख ॲड. युवराज धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकित जोगी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या न्याय मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली आहे.