28 November 2026News Website

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान: अमरावतीत विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात

अमरावती, २१ नोव्हेंबर :- गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणाऱ्या आणि लोकसहभागातून ग्रामपरिवर्तनाचा आदर्श घालून देणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत आयोजित विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आला. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

उल्लेखनीय कामाचा गौरव आणि विशेष प्रदर्शन

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभागातून झालेली प्रगती आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदांच्या वतीने विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात उमेद अभियान, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग तसेच विविध महिला बचत गटांच्या उत्पादनांची दालने उभारण्यात आली होती. मान्यवरांनी या दालनांना भेट देऊन विविध शासकीय उपक्रमांची माहिती घेतली आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी करत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम, आमदार प्रवीणजी पोटे, संजयजी खोडके, राहुलजी कुल, राजेशजी वानखेडे, प्रवीणजी तायडे, गजाननजी लवटे, केवलरामजी काळे, सईताई डहाके, उमेशजी यावलकर, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांतजी पुलकुंडवार आणि अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यमजी गांधी उपस्थित होते. त्यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सशक्त ग्रामपंचायत, समृद्ध गाव आणि सक्षम महाराष्ट्र हेच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आहे.”

अभिषेक किशोर भागडे