नवी दिल्ली :- अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या जमिनी बळजबरीने गिळंकृत करण्याच्या मनमानीला सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात ग्रामसभेची पूर्वसंमती घेतल्याशिवाय अनुसूचित क्षेत्रातील जमीन अधिग्रहित करता येणार नाही, असा स्पष्ट व ठाम आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निकाल देत ओडिशा हायकोर्टाचा निर्णय फिरवला आहे.
नेमके प्रकरण काय ? ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील कुकुडा, बिहाबंधा आणि लांजीबेरना या तीन गावांतील सुमारे २७३.५७ एकर शेतजमीन डालमिया सिमेंट भारत लिमिटेडच्या खाणकामासाठी संपादित केली जात होती. कंपनीकडे खाण पट्टा असला, तरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हक्क स्थानिक शेतकऱ्यांकडे होते. २६ जानेवारी २०२० रोजी ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमताने अधिग्रहणाला विरोध केला होता; मात्र तरीही अधिग्रहणाची प्रक्रिया रेटण्यात आली. याविरोधात बिबोल टोप्पो व इतर गावकऱ्यांनी लढा दिला. ग्रामसभेची संमती ही केवळ औपचारिकता असल्याचा ओडिशा हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे चुकीचा ठरवत रद्दबातल केला.
💥 सुप्रीम कोर्टाचे खणखणीत मुद्दे 💥
- ग्रामसभेची पूर्वसंमती अनिवार्य :- जमीन अधिग्रहण कायदा २०१३ च्या कलम ४१(३) नुसार अनुसूचित क्षेत्रात जमीन संपादित करण्यापूर्वी ग्रामसभेची पूर्वसंमती घेणे हा केवळ सल्ला नसून कायद्याची अनिवार्य अट आहे.
- खासगी कंपनीसाठी ८० टक्के संमती :- खासगी कंपनीसाठी जमीन घ्यायची झाल्यास प्रभावित कुटुंबांपैकी किमान ८० टक्के कुटुंबांची पूर्वसंमती आधीच घेणे बंधनकारक आहे; ती नंतर घेऊन चालणार नाही.
- खाण पट्टा म्हणजे जमिनीची मालकी नव्हे :- खाण पट्टा मिळाल्याने कंपनीला जमिनीवर मालकी हक्क मिळत नाही आणि मूळ जमीनमालकांचे हक्क संपुष्टात येत नाहीत.
महत्त्वाचा निकाल :- डालमिया सिमेंट कंपनीसाठी करण्यात आलेली संपूर्ण जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे.
आदिवासी समाजात जल्लोष; हक्कांना नवी धार वर्षानुवर्षे सरकार आणि कंपन्यांकडून ग्रामसभेला डावलून आदिवासींच्या जमिनी हडपण्याच्या प्रकारांवर या निर्णयाने अंकुश ठेवला आहे. ग्रामसभेला खरी घटनात्मक व कायदेशीर ताकद मिळाल्याने आदिवासी समाजामध्ये सुप्रीम कोर्टाबद्दल अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे. हा निकाल केवळ ओडिशापुरता मर्यादित न राहता देशभरातील सर्व अनुसूचित क्षेत्रांतील आदिवासी गावांसाठी मार्गदर्शक आणि निर्णायक ठरणार आहे.
“सुप्रीम कोर्टाचा दणका! ग्रामसभेच्या परवानगीशिवाय आदिवासींच्या जमिनीला हात लावता येणार नाही “





