28 November 2026News Website

दुष्काळात जाळपोळ, अमरावतीच्या मोर्शी नगर परिषदेच्या छतावर शासकीय बाबूंची ‘ओली पार्टी’!

अमरावती :- एकीकडे संपूर्ण जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत पिचत असताना आणि सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदेमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शासकीय कार्यालयाचे नियम पायदळी तुडवत नगर परिषदेच्याच छतावर (टेरेसवर) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘ओली पार्टी’ सजवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.



💥 ड्रोन कॅमेऱ्याने पोलखोल 💥

शासकीय कार्यालय बंद असताना रात्रीच्या सुमारास नगर परिषदेच्या इमारतीवर हा मद्यतळीचा कार्यक्रम रंगला. या लाजिरवाण्या प्रकाराचा ड्रोनद्वारे काढण्यात आलेला व्हिडिओ आणि आतील फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये नगर परिषदेच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह इतर शासकीय विभागांतील बाबूंचाही सहभाग असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.



🙏 जनतेमध्ये प्रचंड रोष 🙏

जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या आणि जनतेच्या हित्‍यासाठी असणाऱ्या शासकीय कार्यालयाचा वापर अशा रंगेल पार्ट्यांसाठी होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “दुष्काळाचे संकट तोंडावर असताना प्रशासकीय अधिकारीच असा बेजबाबदारपणा करत असतील, तर सामान्यांनी दाद मागितली कुणाकडे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर आता वरिष्ठ प्रशासन या भ्रष्ट आणि मस्तवाल अधिकाऱ्यांवर काय कठोर कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अभिषेक किशोर भागडे