चंद्रपूर, दि. १३ :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांचे अतुलनीय योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदा राज्यात ‘जनजातीय गौरव दिन’ अत्यंत दणक्यात साजरा केला जात आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील मुख्य सोहळ्याच्या आयोजनाचा बहुमान गडचिरोली जिल्ह्याला मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हर्च्युअल माध्यमातून) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, या सोहळ्यास राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जल, जंगल, जमीन आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, या गौरव दिनाच्या उपक्रमांत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे.
सेवा सप्ताहातून शासकीय योजनांची दारापर्यंत धडक
जनजातीय गौरवदिनाचे औचित्य साधून ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. यादरम्यान माडिया, गोंड, कोलाम, कातकरी आणि पारधी या विशेष मागास आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
- दुर्गम व अतिदुर्गम भागांत विशेष शिबिरे आयोजित करून जन्म-मृत्यू दाखले, ओळखपत्रे आणि विविध शासकीय योजनांचे लाभ तत्परतेने दिले जात आहेत.
- एकही पात्र आदिवासी बांधव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी चार अपर आयुक्त कार्यालये आणि ३० एकात्मिक आदिवासी प्रकल्पांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक प्रगतीपासून ते आर्थिक सक्षमीकरणापर्यंत महत्त्वाचे निर्णय
- गुणवत्तापूर्ण शिक्षण व मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण :- राज्यातील सुमारे ५०० शासकीय आश्रमशाळा, ४९१ वसतिगृहे आणि अनुदानित शाळांमधून शिकणाऱ्या ५ लाख विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी पात्र शिक्षकांची भरती केली आहे. तसेच, नीट (NEET) आणि जेईई (JEE) च्या तयारीसाठी १ हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे.
- वनहक्कांची प्रभावी अंमलबजावणी :- पात्र आदिवासींना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क पट्टे देण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून, आगामी सहा महिन्यांत पेसा (PASA) अंतर्गत भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
- ‘बिरसा कला संगम’चे व्यासपीठ :- आदिवासी तरुण-तरुणींच्या पारंपरिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, २५०० हून अधिक ऑनलाइन प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
- ६८ हजार महिला बचत गट :- ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर राज्यात तब्बल ६८ हजार बचत गट उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे आदिवासी महिला आता उद्योजिका बनत आहेत.
“आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर करूया आणि सेवा सप्ताहातील उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊया.” डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर.





