चंद्रपूर, दि. 04 :- दुर्गम, ग्रामीण व आदिवासी भागातील वंचित विद्यार्थ्यांपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात नावीन्यपूर्ण मौखिक आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 60 शाळा व वसतिगृहांमधील एकूण 8750 विद्यार्थ्यांची दंत व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी तथा दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.एकूण तपासणीमध्ये 3871 विद्यार्थ्यांची मौखिक स्वच्छता चांगली आढळली, तर 2658 विद्यार्थ्यांमध्ये मौखिक स्वच्छतेचा अभाव दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये दात किडणे, दंत फ्लोरोसिस, दातांची अनियमित रचना, तसेच विद्यार्थ्यांमध्ये इतर मौखिक आरोग्यविषयक समस्या नोंदविण्यात आल्या.
अभियानादरम्यान डॉ. संदीप पिपरे यांनी विद्यार्थ्यांना दुधाचे व कायमस्वरूपी दात, दातांची रचना व कार्य, दात किडणे, हिरड्यांचे आजार, प्लाक व कॅल्क्युलस, फ्लोरोसिस, योग्य ब्रशिंग पद्धती, फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट, संतुलित आहार आणि नियमित दंत तपासणी याबाबत मार्गदर्शन केले. तंबाखू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम आणि तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे याबाबतही जनजागृती करण्यात आली.दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपर्यंत दंत आरोग्यसेवा पोहोचविणे, दंतविकारांचे वेळीच निदान करणे आणि आवश्यक उपचारांसाठी पाठपुरावा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात नियमित दंत तपासणी, उपचारांची पूर्तता, शाळास्तरीय आरोग्य शिक्षण आणि तंबाखूमुक्ती जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे डॉ. संदीप पिपरे यांनी सांगितले.
या अभियानात कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. रवींद्रकुमार गेडाम, डॉ. दीपशिखा मुसळे, डॉ. रश्मी डोंगरवार, डॉ. नमिता कांबळे, डॉ. स्मिता दास, डॉ. लक्ष्मी गहुकार, डॉ. भाग्यश्री बचाटे, डॉ. निशू अग्रवाल, डॉ. शिवानी बोंगिरवार, डॉ. अपूर्वा रामटेक, डॉ. निखिल शास्त्रकार आणि डॉ. अथर्व बेले यांनी सहभाग घेतला.





