7 November 2026News Website

ग्रामपंचायतीचा पाठपुरावा अन् GMR वरलक्ष्मी फाउंडेशनचा धडक पुढाकार! दहेगावात नाल्यावरील नवीन पुलाचे उत्साहात भूमिपूजन; बळीराजाचा प्रश्न अखेर सुटला!

दहेगाव :- पावसाळ्यात तुडुंब भरणाऱ्या नाल्यामुळे शेतात ये-जा करताना आणि जीव मुठीत धरून शेतमाल वाहतूक करताना दहेगावातील शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अखेर संपुष्टात आल्या आहेत. दहेगाव ग्रामपंचायतीच्या शिफारसीची तातडीने दखल घेत ‘जीएमआर (GMR) वरलक्ष्मी फाउंडेशन’ने मंजूर केलेल्या नवीन पुलाचे आज, शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर २०२६) अत्यंत उत्साही वातावरणात अधिकृत भूमिपूजन पार पडले.

श्री वामन खिरटकर यांच्या शेतालगत वाहणाऱ्या नाल्यावर या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद होत असे. खते, बियाणे शेतात नेणे असो वा पिकवलेला शेतमाल सुरक्षित बाजारात आणणे असो, शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत होती. ही गंभीर समस्या ओळखून दहेगाव ग्रामपंचायतीने जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशनकडे या कामासाठी आग्रही शिफारस केली होती. फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत या मागणीची दखल घेत पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली.

आज झालेल्या या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्याला दहेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. विशाल नानाजी पारखी आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. राजेशजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जीएमआर कंपनीचे CSR प्रतिनिधी श्री. गोहणे सर, दहेगाव सेवा सहकारी संस्थेचे सदस्य श्री. विलासराव ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विठ्ठलजी बोधाने, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंढरी घुगल व श्री. प्रकाश खापणे यांनीही उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

या महत्त्वपूर्ण विकासात्मक प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी गावातील प्रमुख नागरिक श्री. श्रीकांत ढवळे, श्री. विजय ढगे, श्री. प्रकाश ढगे, श्री. शुभम घुगल तसेच या कामाचे बांधकाम व्यावसायिक श्री. श्रीजीत कारेकार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील शेतीव्यवसाय अधिक गतिमान होणार असून ग्रामस्थांमधून सरपंच, ग्रामपंचायत प्रशासन आणि जीएमआर फाउंडेशनचे मनापासून आभार मानले जात आहेत.

अभिषेक किशोर भागडे