6 November 2026News Website

वरोऱ्यातील खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ! तालुका क्रीडा संकुलाचे मैदान व्यावसायिक महोत्सवासाठी भाड्याने देण्याचा प्रकार निषेधार्ह

वरोरा (प्रतिनिधी) :- तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे खेळाडूंच्या सरावासाठी आणि क्रीडा विकासासाठी असलेले क्रीडा मैदान आता व्यावसायिक व करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी आंदण दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘कल्पतरू फनफेस्ट आनंद मेळावा २०२६’ या व्यावसायिक आयोजनासाठी चक्क १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत क्रीडा संकुलाचे मैदान आरक्षित करण्यात आले असून, यामुळे स्थानिक होतकरू खेळाडूंच्या सरावात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. खेळाडूंच्या हक्काच्या मैदानावर व्यावसायिक उड्डाण व मेळावे भरवणाऱ्या प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध खेळाडू आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मैदानाचा ताबा महिनाभर हुकणार, सरावात व्यत्यय

प्राप्त माहितीनुसार, ‘कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशन, वरोरा’ यांच्या अर्जानुसार तालुका क्रीडा संकुल समितीने (तहसीलदार तथा कार्याध्यक्ष व तालुका क्रीडा अधिकारी तथा सचिव) दि. १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ (६ दिवस) दरम्यान मैदान उपलब्ध करून दिले आहे. एवढेच नव्हे तर, कार्यक्रमाच्या आधी अर्धा दिवस आणि नंतर अर्धा दिवस मिळून एकूण ७ दिवस, तसेच साहित्य ठेवण्यासाठी तब्बल १६ दिवसांचा कार्यकाळ धरून मैदान व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे. या मनमानी कारभारामुळे मैदानाची दुरवस्था होणार असून स्थानिक खेळाडूंचा सराव पूर्णपणे खंडित होणार आहे.

खेळाडूंच्या नुकसानीस जबाबदार कोण

खेळाच्या मैदानांवर अशा प्रकारे व्यावसायिक जत्रा आणि महोत्सवास परवानगी दिल्यास खेळाडूंनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल वरोऱ्यातील क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

  • सरावाचे नुकसान :- ऐन सराव सत्राच्या काळात मैदान बंद राहिल्याने भविष्यात राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकू इच्छिणाऱ्या खेळाडूंच्या प्रॅक्टिसमध्ये मोठा खंड पडेल.
  • मैदानाची नासधूस :- मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमुळे आणि साहित्यामुळे क्रीडांगणाची माती व टर्फ खराब होण्याची शक्यता आहे, ज्याची भरपाई खेळाडूंना करावी लागेल.
  • व्यावसायिक हितसंबंध :- प्रशासनाला खेळाडूंच्या हितापेक्षा केवळ शुल्कापोटी मिळणाऱ्या पैशांची आणि व्यावसायिक आयोजकांचीच चिंता आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

         💥 प्रशासन जाब देणार का 💥

खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्याशी खेळणाऱ्या आणि क्रीडा संस्कृतीचा गळा घोटणाऱ्या या निर्णयाविरुद्ध जर प्रशासनाने तातडीने पावले उचलून हा व्यावसायिक महोत्सव इतरत्र वळवला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त खेळाडू व पालकांनी दिला आहे. खेळाडूंच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या मनमानी कारभारास नेमके जबाबदार कोण, याचे उत्तर आता तालुका क्रीडा संकुल समितीला द्यावेच लागेल!

अभिषेक किशोर भागडे