6 November 2026News Website

समाजातील प्रत्येक घटकाचे व्हावे कल्याण – डॉ. मनाली क्षीरसागर.विद्यापीठाच्या माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचे निःशुल्क वितरण

नागपूर : (२१-१०-२०२६) :- समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण व्हावे ही आपण सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचे निःशुल्क वितरण मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले. माहिती व मार्गदर्शन केंद्र उद्घाटन तथा पुस्तिकेचे लोकार्पण करताना कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर मार्गदर्शन करीत होत्या.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, उद्घाटक म्हणून भारतीय रेल्वेचे मुख्य प्रकल्प अधिकारी श्री. पवन आर. पाटील (आयआरएसई), प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, माजी कुलसचिव तथा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार डॉ. पुरणचंद्र मेश्राम, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश दखणे, डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांची उपस्थिती होती. गौतम बुद्ध यांच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या संदेशाप्रमाणे संघटनेने माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेच्या माध्यमातून २६ वर्षांपासून सर्वांच्या कल्याणाचा पाया घातला असून विद्यापीठाच्या वतीने हे कार्य यापुढे देखील सातत्याने सुरू राहील, असे कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी पुढे बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देत त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. विद्यापीठ हे विद्येचे माहेरघर असून विविध अभ्यासक्रमांना तरुणांसह वरिष्ठ नागरिक देखील प्रवेश घेत अध्ययन करतात. यावरून शिक्षणाविषयी असलेली तळमळ दिसून येत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.



प्रज्ञावान बनत समाजाला शिक्षित करा – पवन पाटील

शिक्षणातून ज्ञान प्राप्त करीत ज्ञानातून प्रज्ञावान बनत समाजाला शिक्षित करा, असे आवाहन भारतीय रेल्वेचे मुख्य प्रकल्प अधिकारी श्री. पवन आर. पाटील (आयआरएसई) यांनी माहिती व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करताना केले. समाजाला पुढे नेण्यासाठी भारतीय संविधानातील मूल्यांचा वापर करीत कशाप्रकारे उपक्रम राबविले जातात याचे उत्तम उदाहरण माहिती व मार्गदर्शन पुस्तिका असल्याचे त्यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने केंद्राचे उद्घाटन करण्याची मिळालेली संधी जीवनातील सर्वोत्तम क्षण असल्याचे पाटील यांनी सांगितले. मार्गदर्शिकाच्या माध्यमातून शिक्षणातून पुढे आलेले लोक समाजाला पुढे नेत देशाच्या प्रगतीत हातभार लावतील, असे देखील त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची त्यांनी स्तुती केली.



यावेळी मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांनी असंख्य प्राचार्यांना या माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचा फायदा झाला असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली पुस्तिका अत्यंत उपयोगाची असून एका अत्यंत कष्टातून हा उपक्रम पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली. मनोगत व्यक्त करताना व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी विद्यार्थ्यांना हक्क व संघर्षाचे मार्गदर्शन ही पुस्तिका करते, असे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मार्गदर्शन पुस्तिका पोहोचावी असे त्यांनी सांगितले. मनोगत व्यक्त करताना माज कुलसचिव डॉ. पुरामचंद्र मेश्राम यांनी मागील २६ वर्षांपासून माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचे वितरण केले जात असल्याची माहिती दिली. भारतीय संविधानाच्या उद्दिष्ट क्रमांक ४ मधील समता, न्याय, बंधता, स्वातंत्र्य याचा आधार घेत या पुस्तिकेची निर्मिती करीत निःशुल्क वितरण करण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच विद्यापीठात निर्माण करण्यात आलेला संविधान प्रास्ताविका पार्क, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर तेथील ग्रंथालय याविषयी त्यांनी माहिती दिली. प्रास्ताविक करताना मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश दखणे यांनी माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेच्या निर्मिती विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च विद्यापीठ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.



माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेच्या संपादक मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, सदस्य म्हणून डॉ. नितीन डोंगरवार, डॉ. जितेंद्र वासनिक, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. विकास जांभुळकर, दिवंगत दिनेशजी शेराम यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन डॉ. चंद्रमणी सहारे यांनी केले तर आभार श्री. मनोज इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सर्वश्री दर्पण गजभिये, शैलेश फुलझेले, मनीष फुलझेले, धम्मा धाबर्डे, अरुण हट्टेवार, विलास बनसोड, मनोज इंगळे, शरद बागडे, विनोद मेश्राम, प्रफुल्ल भोवते, राजेश नानवटकर, विनोद मते, श्रीमती वंदना निकोशे यांनी सहकार्य केले.

अभिषेक किशोर भागडे