7 November 2026News Website

लोकमान्य महाविद्यालयात “ज्ञानभारती मासिक व्याख्यानमालेचे” उद्घाटन ‘वाचन संस्कृती दशा आणि दिशा’ विषयावर डॉ. संजय साबळे यांचे व्याख्यान

वरोरा :- लोकमान्य महाविद्यालयात *”ज्ञानभारती मासिक व्याख्यानमालेचे” उद्घाटन ‘वाचन संस्कृती दशा आणि दिशा’ विषयावर डॉ. संजय साबळे यांचे व्याख्यान वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त लोकमान्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘ज्ञानभारती मासिक व्याख्यानमाले’चे उद्घाटन लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान. श्रीकांत पाटील लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री आणि आनंद निकेतन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संजय साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उत्साहात पार पडले. याप्रसंगी ‘वाचन संस्कृती : दशा आणि दिशा’ या विषयावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा चे ग्रंथपाल डॉ. संजय साबळे यांनी मार्गदर्शन केले.



लोकशिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व वैचारिक उद्दिष्टांना पूरक ठरणाऱ्या या उपक्रमामागे समाजात वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची अभिरुची विकसित करणे आणि दर्जेदार वैचारिक परिसंवाद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही भूमिका आहे. लोकशिक्षण संस्था संचालित लोकमान्य महाविद्यालयात पूर्वीपासून सुरू असलेल्या ‘ग्रंथ संवाद’ या उपक्रमाला वैचारिक परिसंवादाची जोड देत ‘ज्ञानभारती व्याख्यानमाले’च्या माध्यमातून ज्ञान, शिक्षण आणि चिंतन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे प्रास्ताविकातून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी सांगितले.



‘वाचन संस्कृती : दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना डॉ. संजय साबळे यांनी वाचनाचे व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व, बदलत्या काळातील वाचनाच्या सवयी आणि समाजात वाचनसंस्कृती रुजविण्याची आवश्यकता या विषयांवर विचार मांडले. वाचन हे केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून विचारशक्ती विकसित करणारे, ज्ञानाची क्षितिजे विस्तारणारे आणि माणसाला अधिक संवेदनशील बनविणारे माध्यम आहे. डिजिटल युगात माहितीची साधने वाढली असली, तरी सखोल वाचन, चिंतन आणि मनन यांचे महत्त्व कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वाचनाची आवड निर्माण करणे
‘ग्रंथ संवाद’ आणि ‘वैचारिक परिसंवाद’ यांच्या माध्यमातून ग्रंथ, विचारवंत आणि समाज यांच्यात संवादाचे व्यासपीठ निर्माण करणे, तसेच समाजाचा सक्रिय सहभाग वाढविणे हा “ज्ञानभारती व्याख्यानमाला” मासिक उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.



वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या यानंतर दर महिन्याला होणाऱ्या या व्याख्यानमालेतून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाला चालना मिळण्यासोबतच समाजात ज्ञान, चिंतन आणि वैचारिक संवादाची परंपरा अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल लीना पुप्पलवार यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी माने यांनी केले व्याख्यानमालेचा शेवट वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आला. या व्याख्यानमालेला लोकशिक्षण संस्थेच्या विविध आस्थापनांचे प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वरोरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे