6 November 2026News Website

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपुरात वाहतुकीत मोठे बदल; १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान  वाहनांना प्रवेश बंद

चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर येथे १५ व १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अत्यंत उत्साहात व दणक्यात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातून लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना कोणतीही वाहतूक कोंडी किंवा त्रासाचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून कडेकोट बंदोबस्त व विशेष वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक अमोल बारपात्रे यांनी दिलेल्या आदेशानुसार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक व पार्किंगचे नवे नियम लागू राहणार आहेत.

🚫 हे मार्ग राहणार पूर्णपणे बंद (नो-एंट्री)

  • वरोरा नाका चौक ते मित्र नगर चौक आणि वरोरा नाका चौक ते पाण्याचा टाकीपर्यंत या दोन्ही मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
  • हे दोन्ही मार्ग ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

🚛 जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड वाहनांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:

  • नागपूरकडून येणारी जड वाहने (बल्लारशाह व मूलकडे जाणारी) :- कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरूनगर व पुढे मूल-बल्लारशाह रोडकडे जातील.
  • मूल व बल्लारशाहकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने :- बंगाली कॅम्प, नेहरूनगर, सीटीपीएस आणि कुंदन प्लाझा हॉटेल या मार्गाचा अवलंब करावा.

🅿️ अनुयायांच्या वाहनांसाठी अधिकृत पार्किंग स्थळे

सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीकरिता शहरभर खालीलप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:

  • नागपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी :-
    • शकुंतला लॉन
    • जनता कॉलेज मैदान
    • जनता कॉलेजसमोरील ईदगाह मैदान
  • शहरातून येणाऱ्या वाहनांसाठी :-
    • सेंट मायकल स्कूल परिसर
    • सिंधी पंचायत भवन
  • वरोरा व आकाशवाणीकडून येणाऱ्या वाहनांसाठी :-
    • लोकमान्य टिळक हायस्कूल मैदान
    • जीवन साहाय्य गृहनिर्माण संस्था (मनोमय रुग्णालयामागे)
  • मूल रोड, बंगाली कॅम्प व तुकूमकडून येणाऱ्या वाहनांसाठी :-
    • कृषी भवनजवळील टॅक्सी स्टँड

💥पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन💥

उत्सव काळात सर्व नागरिकांनी शिस्त पाळून पोलीस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा मदतीच्या प्रसंगी नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन नंबर: ११२ वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

 

अभिषेक किशोर भागडे