6 November 2026News Website

वणीत नागपूर कराराची होळी; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा तीव्र संताप व आक्रमक एल्गार!

  • नागपूर कराराची होळी :- विदर्भावर होत असलेल्या अनुचित अन्याय आणि फसवणुकीच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे नागपूर कराराची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
  • स्वातंत्र्याचा एल्गार :- विदर्भाच्या विकासातील दुजाभाव संपवण्यासाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती’ हाच एकमेव व कायमस्वरूपी मार्ग असल्याची आक्रमक भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
  • प्रमुख उपस्थिती :-  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. बाळासाहेब राजूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष रमेशभाऊ राजूरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी म्हणजेच २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारानुसार विदर्भाच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, आर्थिक तरतुदी व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे भरभक्कम आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विदर्भातील रस्ते, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत अद्यापही अपेक्षित स्थिती निर्माण झालेली नाही. या अनुषंगाने विदर्भातील नागपूर करारातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्याने तीव्र संताप व्यक्त करत, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणी येथे नागपूर कराराची होळी करून शासनाचे लक्ष वेढण्यात आले.

विदर्भातील नैसर्गिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना, त्याचा अपेक्षित लाभ स्थानिक भागाला व भूमिपुत्रांना मिळत नसल्याचा मुद्दा निवेदनाद्वारे अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात आला. नागपूर कराराची अंमलबजावणी न झाल्याने विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा दावा करत, आता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच या सर्व प्रश्नांवरचा एकमेव कायमस्वरूपी मार्ग असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

आंदोलनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:

  • फसवणुकीचा निषेध :- करारातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भाच्या विकासाचा झालेला घोर अनुशेष व फसवणूक.
  • अन्यायाविरुद्ध रोखठोक भूमिका :- नैसर्गिक संपत्ती लुटली जात असताना विदर्भवासीयांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा तीव्र आरोप.
  • पुढील आंदोलनाचा इशारा :- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनाप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. बाळासाहेब राजूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष रमेशभाऊ राजूरकर, रफिक रंगरेज, नामदेव जेनकर, गजेंद्र भोयर, देवराव धांडे, व्ही. पी. टोंगे, प्रभाकर मोहितकर, प्रभाकर उईके, काशिनाथ देऊळकर, दशरथ बोबडे, संजय चिंचोलकर, अनंत मोहितकर, अशोक चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे