” खेमजई गावात शहीद राहुल गोवर्धन चौधरी यांच्या नावाचे स्मारक उभारण्याची गावकऱ्यांची मागणी “
वरोरा (वार्ताहर) :- भारतीय सैन्यातील सीमा सुरक्षा दलात (BSF) कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले आणि पटना (बिहार) येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी देशाच्या सुरक्षेकरिता प्राणांची आहुती देणारे सुपुत्र शहीद राहुल गोवर्धन चौधरी यांच्या वीर स्मृतीप्रित्यर्थ मु. खेमाजई (ता. वरोरा) येथे शहीद स्मारक तयार करण्यात यावे, अशी जोरदार व सामूहिक मागणी खेमजई गावातील समस्त ग्रामस्थ व युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांना अधिकृत निवेदन दिले व स्मारक लवकरात लवकर उभारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाचा विसर पडू देणार नाही! देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानाचे स्मारक त्यांच्या गावात उभे राहणे ही संपूर्ण गावाची व परिसराची भावना आहे. शहीद राहुल चौधरी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी स्मारक उभारणीचे कार्य तातडीने हाती घेण्यात यावे, अशी आग्रही भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली.
या शिष्टमंडळात व निवेदनावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनिकेत नाकाडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रमुख युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शेखर धाबेकर, ईश्वर हजारे, संतोष श्रीरामे, लंकेश भेले, योगेश कोहळे, रोशन हजारे, श्रीकृष्ण दडमल, प्रमोद हजारे, रवी नन्नावरे यांच्यासह खेमजई गावातील समस्त नागरिक व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




