वरोरा (तालुका प्रतिनिधी) :-वरोरा येथे तान्हा पोळ्याच्या पावन पर्वा निमित्त ‘जय बजरंग तान्हा पोळा उत्सव समिती’कडून नंदीबैल प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालगोपालांसाठी विशेष शैक्षणिक साहित्य व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
बालगोपाळांना पारंपारिक संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम ९६० बालगोपालांना टोकन देऊन सोबतच शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे बालगोपालांमध्ये मोठा उत्साह व आनandचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर ईश्वर चिट्ठीने टोकन काढून ७ (सात) बालगोपालांना आकर्षक बक्षीसे जाहीर करण्यात आली. या बक्षीस वितरणामध्ये स्कूल बॅग व सायकलचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आमदार करणदादा देवतळे, नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, नगरसेवक गजानन मेश्राम, आणि मुकेश जीवतोडे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना बक्षीस वितरण करण्यात आले.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृती जोपासण्यासोबतच बालकांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय सुंदर उपक्रम ठरला. “बालगोपाल यांचा उत्साह वाढवूया शिक्षणाची साथ देऊया” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम असाच सतत चालत राहावा, अशी मनोगतामधून भावना आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केली.
हा यशस्वी उपक्रम पार पाडण्यासाठी ‘जय बजरंग तान्हा पोळा उत्सव समिती’चे अध्यक्ष हरिश्चंद्र राजनहिरे, सचिव ज्ञानेश्वर कायरकर आणि सर्व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व यशस्वीरीत्या संपन्न झाला.




