Home जिल्हा स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा...

स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा संगम वार्षिकांक ‘विवेक’चे प्रकाशन; वृक्षारोपण व रक्तदान शिबिराने जयंतीला सामाजिक बांधिलकीची दिशा

भद्रावती :-स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था, वरोराचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले, “स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. समाजहिताची जाणीव ठेवून कार्य करणारी तरुण पिढी घडविण्याची जबाबदारी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने स्वीकारली पाहिजे.”



प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गुरुदेव आश्रम, गुरुकुंज मोझरीचे माजी सर्वाधिकारी तथा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मणराव गमे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “माणसाचे व्यक्तिमत्त्व केवळ पदवीने नव्हे तर मूल्याधिष्ठित शिक्षणाने घडते. सेवा, श्रम आणि संवेदनशीलता या जीवनमूल्यांचा स्वीकार केल्यास समाज अधिक सक्षम होईल. स्व. टेमुर्डे यांच्या कार्यातून समाजसेवा आणि शिक्षणाचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे.” यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेविका वृषालीताई पांढरे, लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार, सामाजिक कार्यकर्ते सुभानभाई सौदागर, विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम पोफळे तसेच महाविद्यालयाचे डॉ. यशवंत घुमे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘विवेक’ या वार्षिकांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वैचारिक, साहित्यिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारा हा वार्षिकांक संस्थेच्या शैक्षणिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेची भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली. या उपक्रमांमुळे जयंती उत्सवाला केवळ औपचारिकतेचा नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वाचा अर्थ प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आणि शिक्षण, सेवा व सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. अमोल ठाकरे, प्रास्ताविक डॉ. यशवंत घुमे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुधीर आस्टुनकर, डॉ. जयवंत काकडे, डॉ. सुहास तेलंग, डॉ. गजानन खामनकर, प्रा. संगीता बांबोडे, डॉ.मोहीत सावे, प्रा.श्रीकांत दाते, प्रा.खोजराज कापगते, प्रा राजू बैरम यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.