Home Breaking News गुडधे गुरुजींनी घेतला पालकांचा विशेष क्लास पाल्यांना शिस्त, अभ्यासाची सवय आणि संस्कारांचे...

गुडधे गुरुजींनी घेतला पालकांचा विशेष क्लास पाल्यांना शिस्त, अभ्यासाची सवय आणि संस्कारांचे दिले धडे

वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे १ जुलैपासून ‘गो विथ स्ट्रक्चर’ चे प्रणेते गोपाळ गुडधे यांनी निशुल्क स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरू केले आहेत. या झोपडपट्टी परिसरातील अनेक विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले असून, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.




गोपाळ गुडधे यांची इंग्रजी शिकविण्याची आगळीवेगळी अध्यापन पद्धती तसेच इतर विषयांचा अभ्यास मुलांनी घरी कसा करावा, याची नवी पद्धत विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही समजावी, या उदात्त हेतूने शनिवार, ११ जुलै रोजी स्थानिक जेतवन बुद्ध विहार येथे पालकांचा विशेष वर्ग घेण्यात आला. या वर्गात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नवीन शिक्षणपद्धती, वर्गातील नियम, मुलांकडून घरी करून घ्यावयाचा अभ्यास, त्याचे वेळापत्रक तसेच पालकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.




या सामूहिक अभ्यास वर्गाची सुरुवात दररोज सायंकाळी ६ वाजता योग शिक्षिका शीतल मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यासाने होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गुरुदेव सेवा मंदिरात प्रार्थना होऊन गोपाळ गुडधे यांचा स्पोकन इंग्लिशचा वर्ग घेतला जातो. असे या अभ्यास केंद्राचे नियमित वेळापत्रक आहे.
यावेळी संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव तसेच स्वयंसेवक चेतन बुरडकर, नूतन बुरडकर आणि सार्थक नागपुरे उपस्थित होते.