वरोरा :- वरोरा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांना हक्काची ‘ग्रीन स्पेस’ उपलब्ध करून देणाऱ्या ‘नमो उद्याना’चे भूमिपूजन आज विशेष उत्साहात पार पडले. विशेष अनुदान निधी २०२५-२६ अंतर्गत नगर परिषद वरोराच्या वतीने मौजा खांजी, सर्व्हे क्र. १६९/३ येथील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये या उद्यानाचे काम हाती घेण्यात आले आहे.
मा. आमदार करणभाऊ देवतळे यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मा. खासदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली. विकासाच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरून खासदार आणि आमदार एका व्यासपीठावर आल्याने वरोराकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विकासकामांत ‘राजकारण’ नाही, तर ‘जनहित’ महत्त्वाचे
भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आ. करणभाऊ देवतळे आणि खा. सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी एकमुखी सुरात सांगितले की, “वरोरा शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम ध्येय आहे. या विकासासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध असून, शहराच्या प्रगतीसाठी आम्ही मिळून काम करत आहोत. भविष्यातही अशाच जोमाने वरोराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे.”
नागरिकांसाठी ठरणार हक्काचे केंद्र
हे उद्यान केवळ सिमेंटचे बांधकाम नसून, ते भविष्यातील पर्यावरण संवर्धनाचे केंद्र असेल. यामध्ये
व्यायाम आणि विरंगुळा :-सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विशेष व्यवस्था.
आरोग्यदायी वातावरण :- शहराच्या प्रदूषणात वाढती हरित क्षेत्रे श्वास घेण्यास मदत करतील.
सामाजिक उपक्रम :- नागरिकांच्या सहजीवनासाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक हक्काचे व्यासपीठ.
मान्यवरांची उपस्थिती :-
या सोहळ्याला सौ. अर्चनाताई ठाकरे, सौ. योगिताताई नेरकर, सौ. वर्षाताई पिसाळ, श्री. बंडुभाऊ देऊळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सिद्धार्थ मेश्राम, शंभूनाथजी वरघणे, संतोषजी पवार, अक्षयजी भिवदरे, मंगेशजी पिसाळ यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरोरा शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी आणि मूलभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची ही युती आता शहराच्या विकासाला नवी गती देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या उद्यानामुळे वरोरा शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार असून, लवकरच हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल, यात शंका नाही.




