वरोरा/अमरावती :- छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या (CGPSC) कठीण परीक्षा प्रक्रियेत अमरावतीच्या सुपुत्राने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. आमला विश्वेश्वर (ता. चांदूर रेल्वे) येथील रहिवासी असलेले पियुष महादेवराव हेरोडे यांनी ‘क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट’ (चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ) या राजपत्रित गट ‘अ’ पदावर निवड मिळवून जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राज्यस्तरीय ‘ओपन कॅटेगरी’मधून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे.
शिक्षणाचा पाया वरोऱ्यात
पियुष यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी १० वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (पुणे) येथून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.फिल. (M.Phil) ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
कठोर परिश्रम आणि सातत्याचे यश
छत्तीसगड शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत होणारी ही नियुक्ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. शेकडो गुणवंत उमेदवारांना मागे टाकत पियुष यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, दुर्दम्य आत्मविश्वास आणि जिद्दीचे फळ आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याचे त्यांचे ध्येय आता प्रत्यक्ष कृतीत उतरणार असून, आरोग्य सेवेसाठी ते एक मोठे बळ ठरणार आहेत.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
पियुष यांच्या या घवघवित यशाबद्दल त्यांचे वडील महादेवराव हेरोडे, आई निर्जला हेरोडे, भाऊ विवेक हेरोडे आणि संपूर्ण हेरोडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मित्रपरिवार, माजी शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी पियुष यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे. त्यांच्या या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुण पिढीला नवी प्रेरणा मिळाली आहे.
पियुष हेरोडे यांच्या या असामान्य यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Home Breaking News अमरावतीच्या सुपुत्राचा छत्तीसगडमध्ये डंका: पियुष हेरोडे यांची ‘क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट’ पदावर थेट निवड




