वरोरा / चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी सौ. अर्चना आशिष ठाकरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या गौरवास्पद निवडीबद्दल राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौ. अर्चना ठाकरे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय सक्रियतेची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटन बांधणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
विकासासाठी अविरत व उत्तम कार्य :- सौ. अर्चना ठाकरे या वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून, वरोराकरांच्या विकासासाठी त्या अत्यंत उत्तम आणि धडाडीचे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध लोककल्याणकारी व विकासकामे यशस्वीपणे राबवली जात आहेत. नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा, तलाव सौंदर्यीकरण, प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या मूलभूत सुविधांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. तसेच, शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी आणि विविध विकासनिधी आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रभावी पाठपुरावा केला आहे. अहोरात्र नागरिकांच्या सेवा व हितासाठी झटणाऱ्या त्यांच्या या उत्तम लोकप्रतिनिधित्वामुळे वरोरा शहराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे.




