Home Breaking News वनगुन्हा दाबण्यासाठी ३ लाखांची लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि खासगी इसम एसीबीच्या...

वनगुन्हा दाबण्यासाठी ३ लाखांची लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि. २०:-  वनविभागातील भ्रष्टाचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वनगुन्ह्याची कारवाई दाबण्यासाठी आणि फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनरक्षक आणि एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदारावर ११ जून २०२६ रोजी पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रांतर्गत अवैध सागवान लाकूड बाळगल्याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराचा फर्निचर विक्रीचा परवाना रद्द होऊ नये, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास मदनय्या कटकू यांनी वनरक्षक नितेश पांडुरंग मडावी यांच्यामार्फत तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.तडजोडीअंती, लाचेची ही रक्कम श्रीनिवास कटकू यांनी स्वतःसाठी मागितली आणि त्यातील पहिल्या हप्त्यापोटी ५० हजार रुपये खासगी इसम प्रदीप गणेश मंडल याच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचला आणि १९ जून रोजी मुलचेरा-गणेशपूर मार्गावर प्रदीप मंडल याला तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.तिघांवर गुन्हा दाखल चौकशीअंती या लाच प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७, ७(अ) आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक विकास सपणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर पोलीस निरीक्षक किरण बगाटे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एसीबीच्या या धडक कारवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.