Home Breaking News गणेशोत्सवात कायदा मोडाल तर खैर नाही! चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई; तडीपार गुन्हेगारांवर...

गणेशोत्सवात कायदा मोडाल तर खैर नाही! चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई; तडीपार गुन्हेगारांवर ‘एआय (AI) कॅमेरा व्हॅन’ची राहणार करडी नजर

 

चंद्रपूर :-आगामी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक जिल्ह्यात अत्यंत शांततेत, सुरक्षित वातावरणात व विनाअडथळा पार पाडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेत व्यापक मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक श्री. आयुुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक प्रतिबंधक कारवाई यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे.

प्रतिबंधक कारवाईचा सविस्तर तपशील:

  • भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत कारवाई: शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या तब्बल ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.
  • तडीपार (हद्दपार) कारवाई: जिल्ह्यातील शांततेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रिया राबवून जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
  • मिनी तडीपार (कलम १६३ (२) BNSS): उत्सवदरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधेत आणू शकणाऱ्या १,७६१ संशयित इसमािरुद्ध मिनी तडीपारची प्रतिबंधक कारवाई बडकावण्यात आली आहे.
  • एमपीडीए (MPDA ) अंतर्गत कठोर स्थानबद्धता: वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कठोर कारवाई करून त्यांना थेट तुरुंगात डांबण्यात आले आहे.

तडीपार गुन्हेगारांना पोलिसांचा सज्जड आणि कडक इशारा!

  • एआय (AI) तंत्रज्ञानाचा हायटेक पहारा: चंद्रपूर पोलीस दलाच्या अत्याधुनिक ‘एआय (AI) सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन’च्या प्रणालीमध्ये सर्व हद्दपार व तडीपार गुन्हेगारांचे फोटो, चेहरे (Face Recognition) आणि संपूर्ण माहिती नोंदवण्यात आली आहे.
  • अलार्म प्रणाली सक्रिय: हद्दपारीचा कालावधी सुरू असताना कोणताही गुन्हेगार विनापरवाना चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करताना किंवा फिरताना आढळल्यास, एआय व्हॅनचे कॅमेरे त्याला तात्काळ ओळखून (Face Catch) अलार्म देतील.
  • कठोर कायदेशीर शिक्षा: आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अत्यंत कठोर दंडात्मक व तुरुंगा ची कारवाई केली जाईल.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने उत्साहात व भक्तीभावाने जावा, तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.