वरोरा, दि. २४ : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व NSS स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत वाघ आणि डॉ. गोपाल वरुडकर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत NSS ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी डॉ. प्रशांत वाघ व डॉ. गोपाल वरुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छतेची भावना आणि समाजसेवेची वृत्ती विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन NSS कार्यक्रम अधिकारी धनश्री पंचभाई मॅडम, सुरेश राठोड सर आणि निरज आत्राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. NSS स्थापना दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची जाणीव करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘Not Me But You’ या NSSच्या सेवाभावी विचाराला अधोरेखित करत समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




